प्रा.डॉ. यशवंत साधु यांचे साहित्य :

वै. शंकरमहाराज खंदारकरविश्वस्त संस्थेचा उद्देश केवळ श्री. शंकरमहाराज खंदारकर यांचे ग्रंथ प्रकाशित करणे एवढाच नसून संतसाहित्याचा सूक्ष्म अभ्यास करणार्‍‍या व्यक्तींचे ग्रंथ प्रकाशात आणणे हाही या विश्वस्त संस्थेचा उद्देश आहे. या दृष्टीने संतसाहित्याचे ज्येष्ठ संशोधक, अभ्यासक, उपासक व पू. शंकरमहाराज खंदारकर यांचे चिरंजीव डॉ. यशवंत साधु यांचे पुढील साहित्य वै. शंकरमहाराज खंदारकर विश्वस्त संस्थेने प्रकाशित केले आहे.
'गवाक्ष', 'मंथन', 'अन्वय' ही मध्यमयुगीन मराठी साहित्यविषयक प्रश्नांचा शोध घेणारी डॉ. साधु यांची पुस्तके अन्य प्रकाशकांकडून प्रसिध्द झाली आहेत. तथापि प्राचीन मराठी साहित्यांत विशेष  भर घालणारी डॉ. साधु यांची पुढील पुस्तके या विश्वस्त संस्थेने प्रसिध्द केली आहेत.

१. निळोबांची अभंगवाणी: आकलन व आस्वाद

जगद्‍गुरु तुकाराम महाराज यांचे अनुग्रहीत म्हणजे संत निळोबाराय पिंपळनेरकर होत. त्यांच्यामुळेच वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात अनेक शाखोपशाखांनी फोफावला. ज्ञानदेव ते तुकाराम हा चारशे वर्षाचा कालखंड निळोबारायांनी 'ज्ञानोबा तुकाराम' 'ज्ञानदेव तुकाराम' या जयघोषाने सांधला. निळोबांची अभंगवाणी संतसाहित्यांत त्यांतील वाङमयीन गुणांनी व चिंतनशीलतेमुळे उठून दिसते. निळोबांच्या चरित्राचे व कार्याचे ऐतिहासिक स्वरूप डॉ. साधु यांनी प्रथमच प्रकाशात आणले आहे. तसेच निळोबांच्या काही निवडक व प्रातिनिधिक अभंगाचे रसग्रहण रसिकांच्या आस्वादासाठी डॉ. साधु यांनी सादर केले आहे.

विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे, प्रस्तुत ग्रंथास पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेचा १९९८ या वर्षातील उत्कृष्ट संतवाङमय निर्मितीचा सन्माननीय पुरस्कार मिळाला आहे.

 

२. संत निळोबारायकृत सार्थ श्रीतुकारामस्तुती

संत निळोबाराय यांनी जगद्‍गुरु तुकाराम महाराजांची ३३२ श्लोकांत स्तुती गायली आहे. ही स्तुती म्हणजे गुरुपरब्रह्माचे स्तोत्रच आहे. सद्‍गुरुची ही एक वाङमयीन पूजाच आहे. तुकोबारायांनी निळोबांना अनुग्रह दिला त्या हळव्या क्षणांचे चिरंतन स्मरण म्हणजे ही स्तुती आहे. विविध श्लोकांतून निळोबांनी आत्मस्वरुप व विश्वात्मक सद्‍गुरु तुकोबांवर स्तुतिसुमने वाहिली आहेत. डॉ. साधु यांच्या 'सार्थ तुकारामस्तुती' त या स्तुतिसुमनांचा सुगंध पानोपानी दरवळतांना दिसतो. प्रत्येक श्लोकांतील परमात्मभाव व दार्शनिक स्वरुप यांची सुंदर उकल डॉ. साधु यांनी साध्या सोप्या शब्दात केली आहे.

 

३. दासमारुतीविरचित 'श्री साधुसुधा'

वै. शंकरमहाराज खंदारकर यांचे 'भावार्थ एकनाथी भागवत', 'अनुभवामृतभाष्य','सार्थ एकनाथी भारुडे' हे ग्रंथ डॉ. साधु यांनी संपादित करून प्रसिध्द केले. त्याचबरोबर वै. मारुती महाराज ब्रह्मचारी (समाधी:लोहा, जि. नांदेड) यांनी लिहिलेला 'श्रीसाधुसुधा' हा ग्रंथ डॉ. साधु यांनी संपादित केला आहे. 'श्रीसाधुसुधा' म्हणजे श्री संत साधुमहाराज यांचे मारुतीमहाराज यांनी रसाळ शैलीत व १६ अध्यायात लिहिलेले ओवीबध्द चरित्र आहे. श्री साधुमहाराज हे अठराव्या शतकांतील मराठवाड्यातील प्रसिध्द संत होते. हिंदू, मुसलमान, शैव, वैष्णव, गाणपत्य, माध्व, शाक्त इत्यादी  असंख्य भेदांत विभागलेल्या धर्मव्यवस्थेला भगवद्‍भक्तीच्या एका व्यापक सूत्रात गोवण्याचे ऐतिहासिक कार्य श्री संत साधुमहाराज यांनी केले. डॉ. साधु यांनी वरील ग्रंथाच्या प्रस्तावनेत साधुमहाराजांच्या चरित्राची व कार्याची वस्तुनिष्ठ चिकित्सा केली आहे. श्री साधुमहाराजांची शिष्यपरंपरा अनेक शाखोपशाखांनी मराठवाड्यात विखुरली आहे. मराठवाड्यातील एका अज्ञात संताच्या चरित्राला व कार्याला उजाळा देण्याचे कार्य डॉ. साधु यांनी केले आहे.