श्री शंकर महाराज खंदारकर यांची ग्रंथ संपदा:-

१. श्री. ज्ञानेश्वरी भावदर्शन (दोन खंड) :

ग्रंथराज ज्ञानेश्वरीवर वारकरी संप्रदायात आजवर अनेकांनी विवरणे लिहिली. परंतु महाराजांनी ज्ञानेश्वरीवर जे विवरण लिहिले ते अभ्यासकांना उपयुक्त ठरले आहे. ओवी खालीच अर्थ लिहिल्यामुळे ओवीचा अर्थ अभ्यासकास सुसंगतपणे लक्षात येतो. काही ओव्यांवर गरजेनुसार महाराजांनी अधिक विवेचन केले आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरीतील ओवीचा गाभा अधिक प्रकाशमान होतो. विशेष म्हणजे महाराजांनी 'ज्ञानेश्वरी भावदर्शन'ला जी विस्तृत प्रस्तावना लिहिली आहे त्याआधारे प्रत्येक अध्यायाचे 'भावदर्शन' सुलभ रीतीने घडते.

पृष्ठ १४९४


२. भावार्थ एकनाथी भागवत (दोन खंड) :

संतश्रेष्ठ श्रीएकनाथमहाराजांनी श्रीमद्‍भागवताच्या एकादशस्कंधावर जी ओवीबद्ध टीका लिहिली त्यास 'एकनाथी भागवत' म्हटले जाते. महाराजांनी एकनाथी भागवताचा भावार्थ लिहिला. संत एकनाथांची ओवी वरवर सोपी वाटते. परंतु अनेक ठिकाणी नाथांची ओवी जेंव्हा सिद्धांतघटित असते. तेंव्हा ती वाचकांना कोड्यात टाकते. महाराजांनी सोप्या शब्दांत सिद्धांताची उकल केली आहे. एकाच पानावर ओवी आणि ओवीचे विवेचन असल्यामुळे वाचकास ओवीचे रहस्य समजून घेण्यास मुळीच अडचण पडत नाही. विशेष म्हणजे महाराजांच्या भावार्थ एकनाथी भागवतात मूळ श्रीमद्‍भागवताच्या (एकादशस्कंध) संस्कृत संहितेचाही अर्थ दिला आहे. अशी सोय इतर कोणत्याही भागवतात नाही. त्यामुळे मूळ संस्कृत श्लोक आणि नाथांच्या ओवीतील भावार्थ यांची व्याप्ती सुजाण वाचकास जोखता येते.

पृष्ठ १७०८

 

३. श्री. तुकाराम महाराज गाथाभाष्य (दोन भाग) :

महाराजांचा सर्वात लोकप्रिय ग्रंथ म्हणजे श्री तुकाराम गाथाभाष्य होय. तुकोबांचे अभंग म्हणजे महाराष्ट्राचे वेद. प्रत्येक अभंगातील चरणाचे रह्स्य आणि सर्वच चरणांचा एकमेकांशी असलेला अर्थपूर्ण संबंध उलगडून दाखविण्याची महाराजांची हातोटी अनन्यसाधारण आहे. तुकोबारायांच्या गाथेवर इतरही मान्यवर मंडळींनी विवरणे लिहिली आहेत. पण त्यात बर्‍याच त्रुटी आढळतात. धरसोड झालेली आढळते. महाराजांचे विवेचन मात्र परिपूर्ण आहे. काही अभंगाचा तर त्यांनी विस्तृत परामर्श घेतला आहे. महाराष्ट्रातील संत साहित्याच्या अनेक मान्यवर अभ्यासकांनी या ग्रंथाचे कौतुक केले आहे.

पृष्ठ ११७५

 

४. श्री अनुभवामृत भाष्य :

अनुभवामृत' ही श्रीज्ञानेश्वरमाऊलींची अद्वितीय रचना आहे. यातील अनुभवांचा तळ शोधणे भल्याभल्यांना शक्य झाले नाही. पण महाराजांनी मात्र या ग्रंथातील विश्वात्मक, सुंदर व गूढ अनुभवांचे अनेक पैलू प्रकाशात आणले आहेत. वेदांताच्या अंतरंग जिज्ञासूंना महाराजांचा हा ग्रंथ अतिशय आवडतो. या ग्रंथाची परिभाषाच निराळी आहे. महाराजांनी सोप्या शब्दात या परिभाषेची उकल करून हा अमृताचा अनुभव जिज्ञासूंच्या अंतरंगापर्यंत पोचवला आहे.

पृष्ठ ३१८

 

५. हरिपाठ भाष्य :

श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या हरिपाठातील पहिल्या तीन अभंगावरचे हे भाष्य आहे. श्री शंकराचार्यांच्या भाष्य ग्रंथाच्या शैलीला अनुसरुन लिहिलेला महाराजांचा हा पहिलाच ग्रंथ. येथूनच त्यांच्या ग्रंथलेखनाला सुरुवात झाली. हरिपाठातील अभंगाची भाषा सोपी आहे. ज्ञानदेवांनी अनेक प्रमेयांची सूत्रबद्ध गुंफण केली आहे. त्यातील प्रत्येक चरण म्हणजे एक एक विचारसूत्रच आहे. या सूत्रावर महाराजांनी .खर्‍या अर्थाने भाष्य लिहिले आहे. या ग्रंथात आलेल्या वेदांतातील महत्त्वाच्या प्रमेयांची चर्चा आजच्या कीर्तनकारांना व प्रवचनकारांना निश्चितच मार्गदर्शक ठरणारी आहे.

पृष्ठ ३७२

 

६. श्रीज्ञानदेवांचे पसायदान :

ज्ञानेश्वरीच्या शेवटी आलेल्या पसायदानाच्या नऊ ओव्या म्हणजे विश्वाचे महन्मंगल चिंतणाऱ्या एक महामानवाची नऊ स्वप्नेच आहेत. या स्वप्नसृष्टीला वास्तवाचे स्वरुप आजच्या समाजजीवनात, राजकीय जीवनात, धर्मजीवनात व वैयक्तिक जीवनात कशा प्रकारे प्राप्त होऊ शकेल याचे दिग्दर्शन महाराजांनी या छोट्या ग्रंथात केले आहे. हे पसायपीयूष सर्वांनाच हवेहवेसे वाटणारे आहे.

पृष्ठ ८०

 

७. सार्थ एकनाथी भारुडे :

संत एकनाथ महाराजांच्या नव्वद भारुडांवर महाराजांनी प्रस्तुत ग्रंथात विवेचन केले आहे. भारुडात वरवर प्रपंचातील स्त्रिया, पुरुष यांचे संवाद, व्यक्ती, घटना, तत्कालीन परिस्थिती यांचे चित्रण असले तरी भारुडांना एक दार्शनिक व सैद्धान्तिक बैठक आहे. ती दार्शनिक बैठक समजल्याशिवाय भारुडांचा अर्थ उलगडत नाही. महाराजांनी अतिशय सोप्या शब्दात त्यातील उपमेय व उपमानांची उकल केली आहे. वेदान्त, नीती, धर्म, भक्ती, व्यवहार यांची हसत-खेळत शिकवण देणारा भारुडांचा हा मेवा महाराजांनी प्रस्तुत ग्रंथात सादर केला आहे.

पृष्ठ १०४

 

८. नामदेव चरित्र विवेचन :

संत नामदेवमहाराजांचे जन्मस्थान म्हणजे नरसी बामणी (ता.जि.हिंगोली) होय. पण अनेक अभ्यासकांना हे मत मान्य नाही. परंतु महाराजांनी संत नामदेवमहाराजांच्या अभंगाच्याच आधारे संत नामदेवमहाराजांचा जन्म नरसी बामणी येथे झाला हे सिद्ध केले आहे, महाराजांच्या संशोधकबुद्धीची चुणूक या छोट्याशा पुस्तिकेत दिसून येते.

पृष्ठ ४०