वै. शंकरमहाराज खंदारकर विश्वस्त संस्था:

 

पू. श्री शंकरमहाराजांचे निर्याण १९८५ साली झाले. ते हयात असतांना त्यांच्या आठ ग्रंथापैकी पाच ग्रंथ प्रकाशित झाले होते. पण श्रीअनुभवामृत भाष्य, भावार्थ एकनाथी भागवत, सार्थ एकनाथी भारुडे हे मौलिक ग्रंथ अप्रकाशितच राहिले. पू. महाराजांच्या निर्याणानंतर या ग्रंथांची हस्तलिखिते तशीच पडून राहिली. महाराज असतांना जे ग्रंथ प्रकाशित झाले होते त्याच्यांही आवृत्या संपत आल्या होत्या. लोकांकडून महाराजांच्या ग्रंथांची मागणी होऊ लागली. ही निकड लक्षात घेऊन पूज्य महाराजांवर उत्कट प्रेम करणाऱ्या कांही निस्पृह व सेवाभावी मंडळींनी १९८९ साली कंधार (जि.नांदेड) येथे एकत्रित येऊन 'वै. शंकर महाराज खंदारकर ग्रंथ प्रकाशन समिती' स्थापन केली. या समितीने महाराजांच्या असंख्य चाहत्यांकडून निधी गोळा केला. ग्रंथप्रसिद्धीपूर्वयोजनेखाली द्रव्य साहाय्य मिळविले. आणि १९९१ साली 'भावार्थ एकनाथी भागवत' हा महाराजांचा अप्रकाशित ग्रंथ दोन खंडात मोठ्या दिमाखदारपणे प्रकाशात आणला. या कामामुळे समितीचा आत्मविश्वास वाढला. सर्व स्तरातील लोकांकडून समितीच्या कार्यास उत्स्फूर्त आर्थिक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पुढचे कार्य करण्यास हुरुप मिळाला. आणि वै. शंकर महाराज ग्रंथ प्रकाशन समितीचेच नामांतर 'वै. शंकर महाराज खंदारकर विश्वस्त संस्थे'त झाले. या संस्थेची रीतसर नोंदणी (नोंदणी क्र. ई-१३९) मा. सहाय्यक धर्मादाय आयुक्त लातूर यांचेकडे १९९३ साली करण्यात आली आणि अतिशय वेगाने या विश्वस्त संस्थेने महाराजांचे उरलेले अप्रकाशित ग्रंथ प्रसिद्ध करण्याचे कार्य हाती घेतले. संस्थेच्या अथक प्रयत्नामुळे अनुभवामृत भाष्य या वेदांतप्रचुर ग्रंथाच्या हस्तलिखितास मुद्रणाचा संस्कार लाभला. 'सार्थ एकनाथी भारुडा' चेही हस्तलिखित प्रसिद्ध झाले. महाराजांच्या कांही लोकप्रिय ग्रंथांच्या तर तीन-तीन आवृत्या या विश्वस्त संस्थेने प्रकाशित केलेल्या आहेत. आज मितीस पूज्य महाराजांचे आठही ग्रंथ अतिशय आकर्षक स्वरुपात या संस्थेने प्रसिद्ध केले आहेत.

 

विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे डॉ. यशवंत साधु लिखित 'संत निळोबांची अभंगवाणी : आकलन व आस्वाद' हे पुस्तक विश्वस्त संस्थेने प्रकाशित केले आणि या पुस्तकास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा(पुणे) १९८८ सालचा उत्कृष्ट संत वाड़्मय निर्मितीचा श्रेष्ठ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या घटनेचा या विश्वस्त संस्थेस नेहमीच अभिमान वाटतो. अर्थात श्री शंकर महाराजांचे ग्रंथ प्रसिद्ध करून पैसा कमवणे हा या विश्वस्त संस्थेचा उद्देश नाही. 'ना नफा ना - नुकसान' या तत्वावर विश्वस्त संस्थेच्या ग्रंथ प्रकाशनाचा व्यवहार चालतो. त्यामुळे बाजारातील इतर पुस्तक प्रकाशन संस्थेप्रमाणे धंदेवाईक दृष्टीकोन ठेऊन हे कार्य केले जात नाही. संतांची सेवा या भूमिकेतून या विश्वस्त संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य कार्य करतात. संस्थेचे काही सन्माननीय सदस्य तर प्रसंगी स्वत:च्या पदराला खार लावून हे कार्य पुढे नेण्याची सातत्याने धडपड करतात. आज कांही अपवाद वगळता बरेचसे धार्मिक ट्रस्ट भ्रष्टाचाराने बरबटले आहेत. परंतु वै. शंकर महाराज खंदारकर विश्वस्त संस्था या घाणीपासून कितीतरी दूर आहे. या संस्थेचे प्रतिवर्षी ऑडिट केले जाते. सर्व हिशोब चोख ठेवला जातो. सर्व व्यवहारात पारदर्शकता असते. लोकांकडून घेतलेल्या पैशाचा योग्य मोबदला ग्रंथ स्वरुपात लोकांनाच दिला जातो. अशी संस्थेची कार्यप्रणाली आहे.

 

श्री शंकर महाराज खंदारकर यांचे ग्रंथ प्रकाशित करणे एवढीच या संस्थेच्या कार्याची व्याप्ती नसावी असे संस्थेच्या कार्यकारिणीस वाटते. लोकांकडून योग्य आर्थिक मदत मिळाल्यास अनेक शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम हाती घेण्याचा संस्थेचा मानस आहे. सध्या संस्थेचा अवाका अतिशय लहान आहे. ग्रंथ विक्रीतून येणारे पैसे पुन्हा ग्रंथ निर्मितीसाठी खर्च होतात, त्यामुळे शिल्लक काहीच नसते. अशा तऱ्हेने गेली पंधरा वर्षे या विश्वस्त संस्थेने केलेले कार्य लोकांसमोर आहेच. लोकांच्या धार्मिक भावना उत्तेजित करून लोकांकडून पैसा गोळा करुन त्याची धार्मिक आतषबाजी करण्यासाठी या विश्वस्त संस्थेने कधीही लोकांपुढे हात पसरला नाही. सद्‍भावनेने लोकांनी जे दिले त्यात संतोष मानून या संस्थेने आपले उद्दिष्ट गाठले आहे. संस्थेचा हा पवित्रा लक्षात घेऊन समाजातील कांही धर्मशील व उदार धनिकांनी या संस्थेच्या कार्यास सढळ हाताने मदत करावी अशी नम्र विनंती आहे. कोणताही गाजावाजा न करता ही संस्था गेली वीस वर्षे वारकरी संप्रदायाची ग्रंथरुपाने सेवा करीत आहे. लोकांनी उदार मनाने आर्थिक मदत केल्यास आणखी कांही विधायक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम हाती घेण्याची जनता जनार्दनाकडून या संस्थेस प्रेरणा मिळेल.