श्री शंकर महाराज खंदारकर

 

विसाव्या शतकात महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा विकास व विस्तार घडवून आणण्यात ज्यांचे प्रयत्न कारणीभूत ठरले त्यांत वै. शंकर महाराज खंदारकर (इ.स. १९२३-१९८५) हे अग्रणी होत. कंधार (जि.नांदेड) येथील प्रसिद्ध संत श्री साधुमहाराज (समाधी काळ: इ.स. १८१२) यांच्या कुळात पूज्य महाराजांचा जन्म झाला. भक्तिपरंपरेच्या या पार्श्वभूमीमुळे महाराजांच्या मुळातल्या चिंतनशील प्रवृत्तीला अनेक पैलू प्राप्त झाले. महामहोपाध्याय परमपूज्य यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे, पंडितप्राण भगवानशास्त्री धारुरकर या प्रेमळ, विद्वान गुरुजनांच्या सहवासामुळे व संस्कारामुळे महाराजांच्या व्यक्तिमत्वात पांडित्याबरोबरच शालीनता व ऋजुता निर्माण झाली. संतवाणीच्या परिसस्पर्शामुळे त्यांच्या विद्वत्तेला माधुर्याचे अंकुर फुटले. त्यांची वाणी रसाळ बनली. त्यांनी आपल्या कीर्तन प्रवचनांनी जवळपास तीन तपे अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांचे प्रवचन गंगेच्या संथ ओघाप्रमाणे गंभीर व सखोल असे. त्यांचे कीर्तन म्हणजे चकोरांना पौर्णिमेच्या चांदण्याची जणू मेजवानीच असे. याशिवाय श्री क्षेत्र पंढरपूर येथे चातुर्मासात ते संस्कृत वेदांतपर ग्रंथांचे अध्यापन करीत असत. मुळातल्या शांत व सौम्य स्वभावामुळे ते लोकांना हवे-हवेसे वाटत.

 

वक्तृत्वाबरोबरच महाराजांनी ग्रंथलेखनही केले. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकारामांची गाथा या वारकरी संप्रदायाच्या प्रस्थानत्रयीवर भाष्यग्रंथ लिहिणारे एकमेव ग्रंथकार म्हणजे वै. शंकर महाराज खंदारकर होत. याशिवाय अनुभवामृतभाष्य, हरिपाठभाष्य, सार्थ एकनाथी भारुडे, श्रीज्ञानदेवांचे पसायदान, श्रीनामदेवचरीत्र विवेचन हे मौलिक ग्रंथ त्यांनी लिहिले. त्यांचे ग्रंथ जिज्ञासू अभ्यासकांत आजही लोकप्रिय आहेत.